भाजपाला "नम्रता हसमुख
गोडबोले'च पुढे नेईल...
कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेलं तर अतिशय चांगलं स्वागत होतं. तो नेता देखील इतक्या आपुलकीने बोलेल, जणूकाही फार जुनी ओळख आहे. तो आपलं काम करो वा ना करो, परंतु अतिशय दिलखुलासपणे गोड बोलून आपलं मन जिंकतो.
""मधुमामा, सांग नं बिहारमध्ये निवडणूक कशी झाली?'' मग मधुमामाच्या गप्पा रंगायच्या. बिहारच्या निवडणुकांच्या गमतीजमती खूप मजेदार असायच्या. आमचा मधुमामा म्हणजे कै. मधुसूदन देव, उत्तरप्रदेश-बिहारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा क्षेत्रीय प्रचारक होता. मग मधुमामा सांगत असे की, भारतीय जनसंघाला खूप कमी जागा मिळाल्या व कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. मग बैठक झाली. जागा कमी का मिळाल्या, विरोधकांनी काय काय बदमाशा केल्या, या सर्व बाबी कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्यायांसमोर मांडल्या. दीनदयालजींनी शांतपणे सर्व ऐकून घेतले. ते शेवटी म्हणाले, ""निवडणूक एका प्रकारे युद्धच असते. संपूर्ण तयारीनिशी उतरायचं असतं. विरोधकांच्या जमेच्या बाजू कोणत्या, त्यांच्या दुबळ्या बाजू कोणत्या व त्यांची रणनीती काय असू शकेल, याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे आपण आपली चाल खेळली पाहिजे. त्यांच्या योजनांना तुम्ही मात देऊ शकत होते. त्यांनी तसले प्रकार केले म्हणून ते जिंकले व आम्ही हरलो, असे म्हणण्यात आता काही अर्थ नाही. पुढच्या तयारीला लागा. लोकांशी संपर्क साधा. गावोगावी जा.'' मधुमामा सांगत असे की, दीनदयालजी कार्यकर्त्यांशी एकदा बोलले की त्यांच्यात एक नवा उत्साह संचारायचा, कार्यकर्ते परत जोमाने कामाला लागायचे.
16 मे 2009 चे लोकसभेचे निकाल खरोखरीच अनपेक्षित होते. भाजपाला इतक्या कमी जागा मिळतील हे अजिबात वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना वाईट वाटतं, परंतु आता कॉंग्रेस का जिंकली व भाजपा का हारली, यावर चिंतन करण्याची भाजपाला जास्त आवश्यकता आहे.
भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यावर मी सामाजिक क्षेत्रात कार्य सुरू केले. बऱ्याच लोकांशी परिचय झाला, ज्यात विविध पक्षाचे नेतेही होते. सामाजिक कामानिमित्त या लोकांच्या भेटी व्हायच्या. काही वर्षांनंतर कॉंग्रेस व भाजपाच्या लोकांच्या बोलण्यातला व वागण्यातला फरक जाणवू लागला. मी हे येथे मुद्दाम नमूद करू इच्छितो, कारण यावर भाजपाच्या गटात आत्मचिंतन झालं, तर त्याचा नक्कीच फायदा होईल. एक सामान्य नागरिक या नात्याने मी या बाबींची नोंद करीत आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेलं तर अतिशय चांगलं स्वागत होतं. तो नेता देखील इतक्या आपुलकीने बोलेल, जणूकाही फार जुनी ओळख आहे. तो आपलं काम करो वा ना करो, परंतु अतिशय दिलखुलासपणे गोड बोलून आपलं मन जिंकतो. अर्थात, याला अपवाद असू शकतील. कॉंग्रेसचे नेते आपल्या कार्यकर्त्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना आपल्यासोबत टिकवून ठेवतात, त्यांच्या आवश्यक गरजा पुरवतात व कुठल्याही प्रकारे त्यांच्या मनाला बोचेल व ते दुखावणार नाहीत याची काळजी घेतात. कार्यकर्त्यांव्यतिरिक्त अनोळखी माणसांना देखील ते आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. आपलं काम करताना कुठेही हे नेते असं भासू देत नाहीत की, ते आपल्यावर खूप उपकार करीत आहेत. संपर्क ठेवून, मनमोकळेपणाने बोलून, गोड बोलून आपण लोकांना जिंकणे गरजेचे आहे, हा त्यांचा मूलमंत्र आहे.
भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये कार्य करण्याची शैली अतिशय चांगली आहे. कार्यक्रमाची योजना आखणे व शिस्तबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. भाजपाचे कार्यकर्ते जेव्हा कुठलीही योजना राबवितात तेव्हा मॅनेजमेंटचे, पुस्तकातील व पुस्तकाबाहेरील, सर्व धडे आपल्यासमोर दिसतात. जे भाजपाचे नेते व कार्यकर्ते संघाचेही स्वयंसेवक आहेत त्यांना तर बालपणापासून शिस्तीचे व देशप्रेमाचे बाळकडू देण्यात येते. संघटनात्मक कार्य, याच शिस्तीमुळे व राष्ट्रभक्तीमुळे पुढे जाते. या देशात असे कितीतरी प्रसंग होते, ज्यात हे कार्यकर्ते मदतीस पुढे सरसावले व मदतीच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. हे कार्य देखील सुनियोजित पद्धतीने केले. पण जेव्हा अशा सद्गुणांचा अहंकार होतो तेव्हा तेव्हा प्रगती खुंटते व त्या संघटनांचा उतरणीचा प्रवास सुरू होतो, असं आपला इतिहास सांगतो. त्यामुळे आपल्या कार्यात विनम्रता असल्यास कार्य सिद्ध होण्यास मदत मिळते.
जनादेश कॉंग्रेसच्या बाजूने लागला व भाजपा बरीच मागे पडली, यावर देशभरात सखोल चर्चा होईलच. राहुल गांधीने झंझावाती दौरे करून लोकांची, विशेषत: तरुणांची मने जिंकली. अर्थात् हेही तेवढंच खरं की, वाहिन्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका वढेराच्या प्रत्येक दौऱ्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं व लोकांना वारंवार दाखवलं. मीडियाला आपल्या बाजूने वळविण्यात कॉंग्रेसला यश आलं. ""मैने आज मेरे दादी की साडी पहनी है,'' असे बोलून प्रियंकाने लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला व हे वाहिन्यांवरून दाखविण्यात आले. राहुल गांधीने आपल्या प्रत्येक भाषणात बोलताना संयम राखला व कुठेही कुणी दुखावला जाणार नाही याची खबरदारी घेतली. राहुल गांधीमुळे कॉंग्रेसमध्ये बऱ्याच तरुणांना पुढे येण्याची संधी मिळाली. ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलटसारखे बरेच तरुण नेते कॉंग्रेस तयार करीत आहे व त्यांना संधी उपलब्ध करून देत आहे. भाजपात तरुणाई कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. भाजपाने युवा नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देऊन पुढे आणणे अत्यंत गरजेचे आहे. अशाने तरुणाई एका नवीन जोमाने कार्यास पुढे येईल व आपल्याला फक्त राबवून घेण्यात येते, ही भावना राहणार नाही. भाजपाने तरुणाईवर विशेष लक्ष द्यावे. निर्णयप्रक्रियेत देखील त्यांच्या मतांचा विचार व्हावा.
मतदान करण्यास बरेच लोक बाहेर पडले नाहीत हे चुकीचे आहे. पूर्वी घराघरांतून लोकांना मतदानास बाहेर काढण्यात येत असे. मतदान हा एक समारंभ असे. पण, यावेळेस कुठेच उत्साह दिसला नाही. मतदानाचा दिवस केव्हा येऊन गेला, हे बऱ्याच लोकांना कळलेपण नाही. म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे व त्या उत्साहाला टिकवणे आवश्यक आहे. कार्यकर्ता हा अत्यंत मोलाचा असतो. कॉंग्रेसला जनादेश मिळाला. जनादेश कधीच चूक नसतो. जनता कार्य बघते. छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, आंध्र, कर्नाटक, बिहार ही उदाहरणे आहेत. ज्या राज्यात भाजपाची सरकारे आहेत त्यात त्यांनी आणखी जोमाने कार्य करायला हवे. सत्ता असली की त्या आधारे कार्याला गती मिळू शकते. लोकांना दिखावा नको, फक्त प्रामाणिक कार्य हवं. स्व. पं. दीनदयालजींनी म्हटल्याप्रमाणे, भाजपाने मन खचू न देता पुढच्या कार्यास लागावे. या संदर्भात आदरणीय अटलजींच्या चार ओळी फार मार्मिक आहेत. ते म्हणतात, ""टूटे हुए दिल से कोई खडा नही होता, छोटे दिल से कोई बडा नही होता, मन हारकर मैदान नही जीते जाते, न ही मैदान जीतने से मन जीते जाते हैं।'' आपण लक्षात घेतले पाहिजे की, काहीही असो, राहुल गांधी मने जिंकण्याच्या प्रयत्नात आहे व त्यात यश मिळालं आहे. भाजपाने आता प्रामाणिकपणे कार्यास लागावे. चेहऱ्यावर हास्य व आपुलकीची भावना, विनम्र राहणं, सदैव गोड बोलणं आत्मसात करावं. यानेच लोकांची मने जिंकता येतील. एक कवी म्हणतो, ""शब्द सम्हाले बोलिये, शब्द के हांथ न पाव, एक शब्द करे औषधी, एक शब्द करे घाव।'' लोकांना "टेकन फॉर ग्रॅंटेड' घेऊ नये. म्हणून "नम्रता हसमुख गोडबोले'ला कधीही सोडू नये.
- कर्नल सुनील वासुदेवराव देशपांडे व्हीएसएम (निवृत्त)
114, वासुदेवलीला, विद्याकुंज,
पांडे ले-आऊट, खामला, नागपूर-25
दूरध्वनी : 0712/2290109
Sunday, May 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment