Sunday, March 29, 2009

नूतन सरसंघचालकांचे पहिले उद्‌बोधन

रा। स्व। संघाचे नूतन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी 21 मार्च 2009 रोजी सरसंघचालकपदाची जबाबदारी स्वीकारली. त्याच दिवशी संध्याकाळी रेशीमबाग संघस्थानावर नागपुरातील स्वयंसेवकांसमोर त्यांचे सरसंघचालक म्हणून पहिले उद्‌बोधन झाले. हिंदीत झालेल्या त्या भाषणाचा हा अनुवाद.

सरसंघचालकपद हे स्वत:तच एक गुरुभार आहे. पू. डॉक्टरजींपासून आजपर्यंत पू. सुदर्शनजींपर्यंत ज्या व्यक्तींनी याचे जे निर्वहन केले, त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा अजूनच वाढली आहे. त्याप्रकारची प्रतिभा, त्या प्रकारचे परिश्रम, हे सर्व माझ्यात आहे, असा दावा मी करू शकत नाही. कारण, मी स्वत:ला खूप चांगला ओळखतो आणि तुम्ही देखील मला चांगले ओळखून आहात. परंतु, कुठल्याही अपरिचित प्रसंगाचा सामना करताना स्वाभाविकपणे संकोच वाटत असतो; थोडी भीती देखील वाटत असते. अशी भावना सुरुवातीलाच झाल्यानंतर आता मात्र मी अत्यंत आश्वस्त आहे. त्याची काही कारणे आहेत. एक तर, मला इथे काही करायचेच उरलेले नाही. मा. रंगा हरिजी, बाबुरावजींनी, अशीच काही मागील प्रसंगांतील वचने सांगितली आहेत. त्या वचनांचे उच्चारण करण्याची देखील माझ्यात योग्यता आहे, असे मी समजत नाही. परंतु, माझ्या मनात एक गोष्ट येते -83 वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेने नंतर एक सिद्ध कार्यपद्धतीच्या अतिशय कुशल आणि सफल प्रयोगानंतर आता नव्याने करण्यालायक माझ्यासाठी काय आहे? संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे -
फोडिले भांडार। धन्याचा तो माल।
मी तो हमाल भारवाही।।
या परंपरेला पुढे न्यायचे आहे। सरसंघचालक या पूजनीय पदाची प्रतिष्ठा आणि ज्या श्रेष्ठ पुरुषांनी आता या क्षणापर्यंत त्या परंपरेचे निर्वहन केले, त्यांची तपस्या, याच्या परिणामस्वरूप हे पद विक्रमादित्यांचे सिंहासन झालेच आहे आणि मला करायचेच काय आहे? तुमची बाजू मांडायची आहे। आमच्या घरात तीन पिढ्यांपासून संघकार्य सुरू आहे आणि आमच्या घरात तीन पिढ्यांपासून वकिली देखील सुरू आहे. मी लॉ कॉलेजमध्ये गेलो नाही; परंतु, दुसऱ्यांची बाजू मांडणे मलाही थोडेफार येते. इतिहासातील एक प्रसंग आहे आणि मी ऐकले, ते आठवले -दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर, इंग्लंडचे दुसऱ्या महायुद्धाचे नायक होते चर्चिल. त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि म्हटले गेले की, त्यांनी इतका पराक्रम केला की, ही इज ए लॉयन ऑफ ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटनचे, आमच्या देशाचे, ते सिंह आहेत. तेव्हा आपल्या भाषणात चर्चिल यांनी म्हटले -आय वॉज नॉट द लॉयन. यू वेअर द लायन्स. आय ओन्ली रोअर्ड फॉर यू. सिंह तर तुम्ही सर्व होते. फक्त त्यावेळी तुमच्यातर्फे गर्जना करण्याचे काम माझे होते.

सरसंघचालकांच्या आवाजाला वजन असते आणि सरसंघचालकांचे म्हणणे सारे जग ऐकते. असे केव्हा होते? जेव्हा सामान्य स्वयंसेवक शाखा नीट चालवीत असेल; आपले काम व्यवस्थित करत असेल तेव्हा. तुम्हा सर्व लोकांची शक्ती या पदासाठी कार्य करीत आहे आणि या पदाची तपस्यारूप जी अवस्था झाली आहे, ती हे कार्य पुढे नेत आहे. तर मग मला चिंता करण्याचे काय कारण? मला तर तो दगड बनायचे आहे; ओझे वाहणारा तो हमाल बनायचे आहे आणि संघाने सांगितले ते काम करायचे आहे. ते मी करणार आणि करीत राहीन. कार्य होणार हे निश्चित आहे. कारण, कुठल्याही कार्याच्या सफलतेसाठी जितके घटक आवश्यक आहेत, ते सर्वच्या सर्व आपल्या संघकार्यात आधीपासूनच विद्यमान आहेत. गीतेत श्लोक आहे -
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पंञ्चमम्‌।।
आमच्या जवळ एक शाश्वत सत्य, अधिष्ठान आहे। ज्या सत्याच्या आधारावर आपले संघकार्य सुरू आहे। ते काय आहे? हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे. संपूर्ण सृष्टीच्या विविध प्रकारच्या साऱ्या अस्तित्वात एक समग्र, एकात्म व एकच तत्त्व आहे, ज्याची ही सारी रूपे आहेत आणि म्हणून, विविधतेवरून कुठल्याही प्रकारचा संघर्ष व्हायला नको; मिळून मिसळून आपल्या स्वत:च्या विविधतेचा सन्मान, स्वीकार सर्व काही करीत विविधतांना मान्यता देऊन सर्वांनी प्रगतिपथावर पुढे गेले पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाप्रति कृतज्ञता ठेवली पाहिजे आणि जीवनात त्या एका तत्त्वाचा साक्षात्कार करण्यासाठी भोगांना त्यागून, त्याग आणि संयमाचे जीवन जगले पाहिजे. हे काय आहे? ही मानवता आहे. यालाच बंधुभाव देखील म्हणू शकतो. या विचाराचा प्रथम साक्षात्कार आणि या विचाराचा प्रत्यक्ष जीवनात अभिव्यक्तिरूप विकास योगायोगाने आमच्या या देशात झाला आहे. समुद्रवेष्टित, हिमालयाच्या मुकुटाने मंडित, आमच्या या मातृभूमीत झाला. याच बंधुभावाला सारे जग म्हणते -हिंदुत्व. ही आमची ओळख आहे. ती आमच्या जीवनाची प्रेरणा आहे. म्हणून आमच्या सर्व पुरुषार्थाचा तो उत्सव आहे; आमच्या सर्व प्रकारच्या प्रगतीचा तो कारक आहे आणि आमच्या सर्व प्रकारच्या वििवधतेला जोडणारे एकमात्र सूत्र आहे. जगात, सृष्टी, मानवता आणि व्यक्ती इत्यादी इत्यादी सर्वांना जोडून संतुलित रीतीने त्या सर्वांच्या जीवनाला प्रगतीच्या दिशेने नेणारे ते एकमात्र तत्त्व आहे. संयोगाने हीच आमची ओळख आहे. म्हणून हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे. ही सत्य गोष्ट आहे. याला कुणी नाकारू शकत नाही आणि नाकारून काहीही फायदा नाही आणि वारंवार तुम्ही नाकाराल तर, केव्हा ना केव्हा सत्य प्रकट होणारच. भलेही 1925 साली लोक म्हणत असतील की, मला गाढव म्हणा; परंतु, हिंदू म्हणू नका. परंतु, आज तशी परिस्थिती नाही. आज हिंदुत्वाचे हे तथ्य सर्वांना मान्य करावे लागत आहे. या सत्याला घेऊन आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. त्या सत्याच्या अनुरूप आपल्या आयुष्याला आकार देणारी कार्यपद्धती आमच्याजवळ आहे. 83 वर्षांच्या प्रयोगानंतर ती सिद्ध कार्यपद्धती झाली आहे आणि या कार्यपद्धतीच्या यशस्वितेसाठी आवश्यक विविध प्रकारचे कार्यकलाप आमचे स्वयंसेवक करीत आहेत. आज आमच्या जीवनाचे असे कुठलेही क्षेत्र शिल्लक नाही, जिथे आमचे स्वयंसेवक कार्य करीत नाही किंवा चांगले कार्य करीत नाहीत. सर्वत्र त्यांच्या कर्तृत्वाला लोक मानत आहेत आणि हे सर्व नीट सुरू राहण्यासाठी, स्वत:ला योग्य करण्याची क्षमता ठेवणाऱ्या, आपल्या जीवनातून कार्याचे प्रत्यक्ष उदाहरण सर्वांसमोर ठेवणाऱ्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांचा संच आमच्याकडे केवळ आहेच असे नाही तर, तो वृद्धिंगतही होत आहे. आणि पाचवा घटक दैव आहे; भाग्य आहे. ज्याला कुणीच जाणत नाही आणि भाग्याला जाणून घेण्याची इच्छा देखील करायला नको. परंतु, काही लोक असे असतात की, ज्यांच्या चारित्र्याच्या तपस्येची अवस्था इतकी उन्नत असते की, त्या उंचीवर आसीन होऊन ते बघतात तेव्हा, त्यांना दूरचे देखील दिसते. आमचे द्वितीय सरसंघचालक पू. गुरुजी असे व्यक्ती होते. तसे आमचे आद्य सरसंघचालक पू. डॉक्टरजी देखील होते. डॉक्टरजींनी म्हटले आहे की, हे ईश्वराचे कार्य आहे आणि गुरुजींनी जाता जाता आम्हाला संदेश दिला आहे -"विजयही विजय है।' तर भाग्य आमच्यासोबत असण्याचे संकेत आधीच प्राप्त झाले आहेत आणि आता ते केवळ संकेत राहिलेले नाहीत. अनुकूलता वाढत आहे. जग कड बदलत आहे. नियतीचे मन बदलत आहे.

एवढ्यातच बंगलोर येथे रामकृष्ण मठाचे स्वामी हर्षानंद लिखित "द एन्साक्लोपिडिया ऑफ हिंदुइझम' या ग्रंथाचे प्रकाशन झाले। प्रकाशनासाठी आले होते, आपले माजी राष्ट्रपती डॉ। अब्दुल कलाम. त्यांचे तिथे भाषण झाले. याच रामकृष्ण मठातर्फे नागपूरहून "जीवन विकास' मासिक प्रकाशित होते. मी त्याचा नियमित वाचक आहे. त्यात या भाषणाचा सारांश प्रकाशित झाला आहे. त्यात डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, इथे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येण्यापूर्वी मी मेरठ येथे गेलो होतो. मेरठ येथे एका संयुक्त हिंदू कुटुंबात मी राहिलो. त्या कुटुंबात 50-70 लोक एकत्र राहतात. खूप आनंद; खूप शांती. मी विचारले, हे कसे काय? ते म्हणाले की, आमची, आमच्या हिंदुत्वाची आमच्या घराण्यात चालत आलेली ही परंपरा आहे. आमचे संस्कार आहेत. किती सुंदर आहे हा हिंदू धर्म -ते, अब्दुल कलाम म्हणत आहेत. ते म्हणतात की, जगात सर्व धर्मांचा ज्यात समन्वय आहे, असा एक हिंदू धर्मच आहे. त्याचे पालन आम्ही सर्वजण आणि जग करू लागेल तर, जगात कुठलीच हिंसा उरणार नाही; कुठल्याही प्रकारची अशांती राहणार नाही. हे सर्व डॉ. अब्दुल कलाम म्हणत आहेत आणि त्या हिंदुत्वाच्या आधारावर आधुनिक जीवन उभे करण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट देखील आता जग मानू लागले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅरिबियन देशांत मला पाठविण्यात आले होते. म्हणून गयाना येथे गेलो. पहिला प्रवास गयाना देशात होता. आता आम्ही न सांगताही आमची प्रसिद्धी साऱ्या जगात करणारे आमचे अनेक विरोधक आहेत. आम्ही त्यासाठी त्यांचे आभारी देखील आहोत. त्यांनी, मी तेथे जाण्याआधीच प्रसिद्धी केली. भयंकर संघटन आहे -आरएसएस नावाचे हिंदुस्थानात आणि त्याचे सरकार्यवाह येत आहेत. चर्चा होऊ लागली. तिथल्या एका संपादकांनी, जे थोडेफार आपल्या संपर्कात होते, त्यांना असलेल्या माहितीच्या आधारावर, एक अग्रलेख लिहिण्याचा विचार केला. तिथे "गयाना टाइम्स'नावाचे वृत्तपत्र आहे, त्यात. आणि योगायोग म्हणजे, मी तिथे जाण्याच्या दुसऱ्या दिवशी, अमेरिकेचे आर्थिक पतन सुरू झाले. सुरुवातीच्या बातम्या येत होत्या. त्यांनी आपल्या अग्रलेखाची सुरुवात अशी केली होती की, जग या संदर्भात काय विचार करीत आहे... हे सविस्तर वाचायचे असेल तर मार्च महिन्याच्या "रीडर्स डायजेस्ट'मध्ये आहे. त्याची प्रस्तावना या अग्रलेखात आहे. त्यात म्हटले आहे की, भीती, भोग आणि एकाधिकाराच्या आधारावर कार्यरत कुठलीही व्यवस्था, त्याच्या जन्मदात्री अमेरिकेतही यशस्वी होऊ शकत नाही, हे सिद्ध झाले अाहे. परंतु, असे संपन्न देश गरीब आणि अविकसित देशांवर आपली एकाधिकारशाही लादण्याचे काम करीत आहेत. याच्या प्रतिक्रियास्वरूप तिथल्या मातीच्या विचारांना घेऊन तिथले एखादे संघटन तिथे उभे होत असते आणि आपल्या देशाची पुनर्रचना आपल्या स्वत्त्वाच्या आधारावर, प्रकृतीच्या अनुकूल करू इच्छिते. भारतात असे एक संघटन -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. असे हे दोन प्रसंग आहेत. छोटे-छोटे आहेत. आणखीही घडत आहेत. आम्हा सर्वांना त्याचा अनुभव आहे आणि म्हणून यासाठी कार्य वाढणार हे निश्चित आहे. ईश्वरीय कार्य असल्यामुळे सफल होणे देखील निश्चित आहे. आम्हा सर्वांना त्यानुसार चालावे लागणार आहे. आपल्या विचारांनुसार जीवन व्यवहारातील अनेक प्रतिरूप (मॉडेल्स) उभे करावे लागतील. हे सारे काम आम्ही करत आहोत आणि काळ जसजसा पुढे जात आहे, तसतसे आपल्या स्वरूपात जो काही बदल करणे आवश्यक आहे, तो करावा लागणार आहे. आमच्याकडे ती गतिशीलता आहे. आम्ही त्याचा परिचय वारंवार दिला आहे. जगासोबत बदलणारे आमचे पहिले संघटन आहे. सर्वात जास्त प्रागतिक, सर्वात जास्त गतिमान (डायनॅमिक) कोण आहे? जगात राष्ट्रीय स्वयंसेवक आहे, जो आपली प्रार्थना देखील बदलवू शकतो. ज्यात सरसंघचालक स्वत:लाच बदलून टाकतात; पाच मिनिटांत. इतक्या सहजपणे परिवर्तन करू शकणारा आपला संघ आहे; संघटन आहे. जसा एखादा मोठा वृक्ष वादळात हवेच्या अनुसार लवचिक बनल्यावर देखील आपल्या मुळांना जमिनीत पक्के ठेवतो. एक इंच देखील आपली जागा सोडत नाही. 83 वर्षांपासून असे कार्य आपण करीत आहोत आणि सर्व मिळून हेच करायचे आहे. करताना तुमच्यातर्फे मला बोलायचे आहे आणि म्हणून विश्वासाने मी म्हणतो की, या सर्व जबाबदारीचे निर्वहन, तुमच्या इच्छेनुसार मी करीत राहीन. आम्ही सर्व मिळून एक टीम आहोत. म्हणून परस्परांच्या दोषांना सांभाळून घेत, आवश्यक गुणवत्तेचे प्रदर्शन करीत, आम्ही या सर्व परिवर्तनासाठी, आमचा विचार अतिशय सत्य आहे; चांगला आहे तरीही, जगात त्याच्या आधारावर परिवर्तन आणण्यासाठी शक्तीचा आधार हवा. त्या शक्तीची निर्मिती लवकरात लवकर करू. या विश्वासासोबतच, तुम्ही सर्वांनी दिलेला गुरुभार स्वीकार करीत, तुम्हा सर्वांना नम्रतापूर्वक प्रणाम करीत आणि तुमच्यासोबत चलण्याचा माझा निश्चय जाहीर करीत, तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करीत, माझे चार शब्द येथेच संपवितो.
अनुवाद : श्रीनिवास वैद्य

No comments:

Post a Comment