Friday, August 7, 2009

महान राजा : कृष्णदेवराय



कृष्णदेवरायाच्या पराक्रमाचे वर्णन केवळ एकाच बाबीने
प्रभावीपणे करता येईल. 19 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत
कृष्णदेवरायाने 38 युद्धे लढली आणि जिंकली.

एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकाचा उंबरठा येत्या वर्ष-दीड वर्षातच आपण ओलांडू. 2010 ते 2020 हे दशक भारताच्या दिग्विजयी सामर्थ्याची मुहूर्तमेढ रोवणारे ठरावे असे स्वप्न आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी समस्त भारतवासीयांसमोर विशेषत: तरुणाईसमोर ठेवले आहे. कलामांची ही आकांक्षा केवळ कल्पनारम्य स्वप्नरंजन ठरवायचे की, तिच्यातील क्रांतदर्शित्वाला प्रत्यक्ष साकार करायचे, याचा विचार अर्थातच तरुण पिढीने करायचा, पण स्वत: अब्दुल कलाम यांचा मात्र ठाम विश्वास आहे, तोे भारतीय युवावर्गाच्या ठायी असलेल्या प्रचंड सुप्तशक्तीवर. विश्वविजयी भारताचे स्वप्न साकार करण्याचे सामर्थ्य इथल्या तरुणांच्या मनात, मनगटात निश्र्चितच आहे, पण त्या "सुप्त' असलेल्या शक्तीच्या जागराचा हुंकार बुलंद व्हायला हवा, पुरुषार्थ जागविला जायला हवा. याच संदर्भात 7 ऑगस्ट 1509 या दिवसाचे स्मरण. काय घडले त्या दिवशी ? पाचशे वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही त्याविषयीच्या स्मृती जागवाव्यात, असे काय वैशिष्ट्य आहे त्या दिवसाचे? ते समजून घेण्याआधी जरा त्या काळच्या इतिहासाकडे एक ओझरती नजर टाकू.
इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचा जन्म होण्यापूर्वी हजारो वर्षांपासून या भरतभूमीत अत्यंत प्रगल्भ आणि प्रगत संस्कृती पिढ्यान्‌पिढ्या नांदत होती. जगाच्या पाठीवर अलौकिक असलेल्या नैसर्गिक वरदानाला आपल्या सखोल चिंतनाची जोड देऊन येथील ऋषी-मनीषींनी येथे अत्यंत प्रगल्भ नागरी जीवनाची सुदृढ परंपरा निर्माण केली होती. साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, स्थापत्य, शिल्प आदी सर्वच क्षेत्रांत अत्यंत वैभवशाली समाज येथे स्थिरतेने आणि समाधानाने जगत होता. जगात अन्यत्र मानवजात अद्यापही जंगली जीवन जगत असताना येथे सुसंस्कृतीच्या सरिता दुथडी भरून वाहत होत्या. याच वैभवाच्या आकर्षणाने, ती समृद्धी ओरबाडण्यासाठी आक्रमकांच्या टोळधाडी 8 व्या शतकापासून या भूभागावर बरसू लागल्या होत्या. शक, हूण, कुषाण, यवन, पठाण अशा आक्रमणकारी टोळ्यांच्या लाटा एकामागून एक येथे धडका देऊ लागल्या. या आक्रमकांशी कडवी झुंज देणारे पराक्रमी सम्राटही येथे एकामागून एक निपजले. मौर्य, गुप्त सम्राट, राणा संग, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान अशा कितीतरी योद्ध्या सम्राटांची नावे घेता येतील. याच यादीत दक्षिण भारताच्या इतिहासात एक नाव ठळकपणे झळकते, ते विजयनगरचे साम्राज्य आणि तेथील सम्राट कृष्णदेवराय यांचे. याच कृष्णदेवराय यांच्या राज्याभिषेकाला 7 ऑगस्ट 2009 रोजी पाचशे वर्षे पूर्ण होत आहेत.
वयाच्या चौतिसाव्या वर्षी, 1509 साली कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीचे अभिषिक्त सम्राट बनले. तिथून पुढे 19 वर्षे विजयनगरची सर्वांगाने भरभराट होत राहिली. कृष्णदेवराय केवळ एक झुंझार सेनानीच होता असे नव्हे तर, बहुश्रुत विद्वान, श्रेष्ठ दर्जाचा कवी आणि साहित्यिक होता. तेलुगु आणि संस्कृत भाषेतील त्याच्या साहित्यकृती ख्याती पावलेल्या आहेत. "अमुक्त माल्यदा' हे महाकाव्य म्हणजे कृष्णदेव राजाची सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती समजली जाते. या महाकाव्यात त्याने राज्यशास्त्राच्या विविध पैलूंची चिकित्सक मीमांसा केली आहे. राजाचे वर्तन कसे असावे, त्याने आपल्या अधिकाऱ्यांची निवड कशी करावी, मंत्रिमंडळ कसे बनवावे, दोषी व्यक्तींना शासन करताना काय धोरण बाळगावे, धनसंपत्तीचा विनियोग कसा करावा, व्यापारउदिमाला कशी चालना द्यावी, जंगले कुठे आणि कशी जोपासावीत, परदेशी व्यापाऱ्यांना कसा आणि किती वाव द्यावा, अशा विविध महत्त्वाच्या बाबींची अतिशय सूक्ष्म चर्चा "अमुक्त माल्यदा' या महाकाव्यात केलेली आढळते.
स्वाभाविकच राजाच्या कारकीर्दीत कला-साहित्य-संस्कृतीलाही वैभव प्राप्त झाले. मध्ययुगीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक वैभवशाली पर्व असे कृष्णदेवरायाच्या कारकीर्दीचे वर्णन केले जाते. "ज्ञानचिंतामणी' हे तत्त्वज्ञानावरील पुस्तक, "जाम्बवती कल्याणम्‌' हे नाटक, "रसमंजिरी' हा अलंकारांसंबंधीचा ग्रंथ, "मदालसाचारित्र' हा चरित्रग्रंथ अशी विविध साहित्य प्रकारातील निर्मिती कृष्णदेवरायाने केली. म्हणून तत्कालीन शिलालेखांतून त्याचा "काव्य-नाटक-अलंकार मर्मज्ञ' तसेच "साहित्यसमर अंगना सार्वभौम' (म्हणजेच युद्धाप्रमाणेच साहित्यातील योद्धा) अशा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख आहे. त्याच्या कारकीर्दीत दक्षिण भारतातल्या चारही भाषांमधून मौल्यवान साहित्यनिर्मिती झाली. त्याचबरोबर संगीत, नाट्य, नृत्य, वास्तुशिल्प, चित्रकला या सर्व कलांच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण विकास घडून आला.
राजनीती आणि युद्धशास्त्र यांच्या बाबतीत तर कृष्णदेवरायाच्या अंगी कमालीचे नैपुण्य होते. एका विलक्षण योगायोगाचा येथे उल्लेख करायला हवा. राजा कृष्णदेवरायही स्वतःला गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत असे. सर्वसामान्यजन, पशुधन, निसर्गसंपत्ती यांचे जतन आणि संवर्धन करण्याची तसेच सीमांचे रक्षण कसोशीने करून प्रजाजनांना निर्भय व निर्वेध जीवन जगता येईल अशी कडेकोट व्यवस्था करणारा चतुरस्त्र राजा असा या बिरुदावलीचा व्यापक अर्थ आहे. या पदवीला सर्वार्थाने सार्थ ठरविणारी प्रगल्भ बुद्धिमत्ता, बहुश्रुतपणा, मुत्सद्दीपण आणि प्रशासनिक कार्यक्षमता या साऱ्या गुणसंपदेचा दुर्मिळ संगम कृष्णदेवरायाच्या ठायी झाला होता.
कृष्णदेवरायाच्या पराक्रमाचे वर्णन केवळ एकाच बाबीने प्रभावीपणे करता येईल. 19 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत कृष्णदेवरायाने 38 युद्धे लढली आणि जिंकली. राज्याच्या सीमांचे संरक्षण, आक्रमणांचा प्रभावी आणि यशस्वी प्रतिकार आणि पराक्रमाच्या बळावर सीमाविस्तार यांच्या कुशल अवलंबाच्या आधारे कृष्णदेवरायाने एक बलदंड राज्य विजयनगरच्या साम्राज्याच्या रूपाने दृढमूल केले. त्याने घातलेला सार्वभौमत्वाचा हा पाया इतका भक्कम होता की, त्याच्या मृत्यूनंतरही जवळ जवळ दीडशे वर्षे विजयनगरचे साम्राज्य टिकून राहिले.
कृष्णदेवरायाच्या कारकीर्दीतील बहुधा सर्वात मोठी युद्धमोहीम 1520 साली आखली गेली. विजापूरच्या आदिलशाहीतील अत्यंत अभेद्य असलेल्या रायचूरच्या किल्ल्यावरच कृष्णदेवरायाच्या सैन्याने स्वारी केली. या स्वारीला निमित्त घडले ते असे ः कृष्णदेवरायाने आपल्या सिद्दी सरकार नावाच्या सेनानीला उत्तम घोडे आणण्यासाठी संपत्ती देऊन गोव्याला पाठविले, पण सिद्दी सरकार फितूर झाला आणि सोबतची संपत्ती घेऊन आदिलशहाला जाऊन मिळाला. यावर केवळ हात चोळत बसणे मंजूर नसलेल्या कृष्णदेवरायाने आदिलशहावर जबरदस्त प्रत्याघात करायचे ठरविले. आपल्या पराक्रमाचा आणि जागरुकतेचा दबदबा यायोगे थेट आदिलखानाच्या दरबारात दुमदुमून टाकावा आणि फितुरीच्या प्रवृत्तीला निर्णायक धडा शिकवून जरब बसवावी हा त्यामागील हेतू असावा.
कृष्णा आणि तुंगभद्रा यांच्या संगमालगतच्या दोआबी प्रदेशात वसलेला रायचूरचा किल्ला अत्यंत मजबूत होता. 8000 पायदळ, 400 घोडदळ, 20 हत्ती आणि 200 तोफा अशी भरभक्कम शिबंदी या किल्ल्याच्या रक्षणार्थ सदैव तैनात असे. अणीबाणीच्या काळात किमान 5 वर्षे पुरेल एवढा धान्यसाठा या किल्ल्यात होता. भरपूर तलाव आणि विहिरी असल्याने पाणीपुरवठ्याचीही चिंता नव्हती. अशा कडेकोट किल्ल्यावर चढाई करणे हे साधेसोपे काम नव्हते, पण कृष्णदेवरायासारख्या धुरंधर सेनानीजवळ साहसी वृत्तीची कमतरता नव्हती आणि वीरश्रीने रसरसलेली त्याची सेनाही तशीच बलाढ्य होती. या स्वारीत कृष्णदेवरायाने सोबत घेतलेल्या सैन्याची आकडेवारी आजही आश्चर्याने थक्क करून टाकणारी आहे. या सैन्यात 4 लाख 31 हजार पदाती (पायदळ), 20 हजार स्वारांचे घोडदळ, 226 हत्तींचे दल आणि त्यात भर म्हणून 30 हजार निष्णात तिरंदाजांची सेना एवढे विशाल सैन्यदल घेऊन कृष्णदेवरायाने रायचूरच्या किल्ल्याला वेढा घातला. इ.स.1520 च्या मार्च महिन्यात घातलेल्या या वेढ्याशी आदिलशहाची सेना जेमतेम दोन महिने झुंज देऊ शकली. 19 मे 1520 रोजी किल्ला शरण आला आणि कृष्णदेवरायाने आपला विजयध्वज त्या किल्ल्यावर रोवला.
एक उत्तम प्रजाहितदक्ष शासक, अष्टावधानी राजा, राष्ट्रनिर्मितीचे उत्तुंग स्वप्न उराशी बाळगणारा आणि ते साकार करण्यासाठी आवश्यक ती सारी व्यूहरचना कुशलतेने उभी करणारा सेनानायक, मुत्सद्देगिरीचा मानदंड आणि अत्यंत प्रगल्भ साहित्यकार कृष्णदेवराय याची 19 वर्षांची कारकीर्द हे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक झळाळते सुवर्णपृष्ठ आहे. 1528 साली कृष्णदेवरायाचे निधन झाले वयाच्या 53 व्या वर्षी. पुढे दीडशे वर्षांनंतर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे सोनेरी स्वप्न साकार करणारे महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज आणि कृष्णदेवराय यांच्या व्यक्तिमत्त्वात, पराक्रमात, दृष्टिकोनात आणि राष्ट्रनिर्मितीच्या कर्तृत्वात असंख्य साधर्म्यस्थळे पाहावयास मिळतात. आणखी एक विलक्षण योग पहा, 1528 साली कृष्णदेवराय निधन पावले पण विजयनगरचे साम्राज्य बुलंदपणे उभे राहिले. त्याचा पाडाव करण्यासाठी बलदंड आक्रमकांनाही सतत दीडशे वर्षे धडका द्याव्या लागल्या. 1674 साली विजयनगरच्या साम्राज्याचा अस्त झाला, पण नेमक्या त्याच वर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याची विजयपताका फडकत ठेवली. दक्षिण दिग्विजयाची पताका निरंतर तेजाळत राहावी, अशी नियतीचीच इच्छा असावी.
- अरुण करमरकर , ठाणे
sahavedana@gmail.com

९३२१२५९९४९

for more details pl see

http://en.wikipedia.org/wiki/Krishnadevaraya

हिंदवी स्वराज्याचा संस्थापक -कृष्णदेवराय



7 ऑगस्ट 1509 विजयनगर साम्राज्याधिपती श्रीकृष्णदेवरायाचा "राज्याभिषेक' दिवस. हिंदवी स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम उरी बाळगणारा,
"गो-ब्राह्मण प्रतिपालक' बिरुदावली सार्थ करणारा, दक्षिणेतला शस्त्र आणि शास्त्र निपुण धुरंधर सम्राट-श्रीकृष्णदेवराय।


बरोबर आजला पाचशे वर्षांपूर्वी हा राजा होऊन गेला. "सकल कला संपन्न, शस्त्रतेजाने शत्रूंना धूळ चारणारा, काव्यगुणाने प्रतिभावंतांना पोसणारा, उत्तम राज्यकर्त्याचे धडे आपल्या ग्रंथलेखनातून भारतीयांच्या पुढे ठेवणारा सम्राट म्हणून कृष्णदेवरायाचं नाव इतिहासात चिरस्मरणीय आहे.
"विजयनगर साम्राज्य' म्हणजे भारतीय हिंदूू संस्कृतीचा, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा "महोन्नत महामेरू' म्हणून ओळखला जातो. धर्म, संस्कृती, कला आणि साहित्य यासंदर्भात या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या कुलवंशातल्या सर्व सम्राटांत कृष्णदेवराय हा एक अतुलनीय असा दिग्गज सम्राट होऊन गेला. याच्या कारकीर्र्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्रीचैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी महापुरुषांना या सम्राटाने सन्मानित केले आहे. प्रख्यात माध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरुदेव होत.
विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत याने आपले साम्राज्य विस्तारले. आपला वराहचिन्हांकित यशोध्वज सदा फडकावीत ठेवला. नाट्य, संगीत, शिल्प, शौर्य आणि साहस या संदर्भात याचे कार्य अद्‌भूतच म्हणावे लागेल असे होते.
कन्नड, तेलुगू, तामिळ आणि संस्कृत या विविध भाषांतून त्याने मनोज्ञ असे ग्रंथ लेखन केले. आंध्रचा "भोजराजा' म्हणून कृष्णदेवरायाची ख्याती भारतीय इतिहासात मुद्रित. या सम्राटाच्या दरबारात प्रतिभासंपन्न अष्टदिग्गज कवीगण होते. "तेलुगू कालीदास' म्हणून सर्वश्रुत असलेल्या "श्रीनाथ' कवीची याने सुवर्णतुला केली. आपल्या कारकीर्दीतल्या अवघ्या एकोणीस वर्षांत या सम्राटाने अडोतीस लढाया केल्या आणि त्या सर्व जिंकल्या. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बिदरशाही, अहमदनगरची निजामशाही या साऱ्यांना चळचळा कापायला लावणारा हा एक शूर योद्धा होता. शत्रूंना आपल्या सीमेपर्यंत येऊ न देता, स्वत:हून शत्रूंचे दार ठोठावणारा हा एक हिंदवी स्वराज्य निर्माणकर्ता राजा होता. कृष्णदेवरायाने लिहिलेल्या काव्यग्रंथांपैकी "अमूल्य माल्यदा' हे काव्य तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यातले एक होय. एकंदरीत शस्त्र आणि शास्त्र याच्यावर अभूतपूर्व हुकुमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही, हे विधान तीळमात्र अतिशयोक्तीचे नाही.
भारतीय इतिहासकारांनी कृष्णदेवरायांच्या कर्तृत्व पराक्रमाची तुलना प्रभू श्रीराम, धर्मराज, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, पुलकेशी या दिग्गज नरपुंगवाशी केली आहे. हा जरी श्रीकृष्णदेवरायाचा दैदिप्यमान इतिहास असला तरी त्याच्या पुढच्या सम्राटांकडून मात्र घोर निराशा झाली. श्रीकृष्ण देवरायाची ताकद त्यानंतर झालेल्या सम्राटांना पेलवली नाही. इ.स. 1929 साली श्रीकृष्णदेवराय यांनी आपली सम्राटपदाची धुरा आपले चुलत बंधू अच्युतरायावर सोपवली. त्यानंतर तिरूमला, रामराजा, वेंकटाद्रि असे सम्राट होऊन गेले. हे सारे व्यसनी आणि दुर्बल निघाले.
ज्या श्रीकृष्णदेवरायाने विजापूरच्या आदिलशहाला सळो की पळो केले, खुद्द आदिलशहाच्या राजधानीत तळ ठोकून तीन महिने मुक्काम केला. ज्या धर्मवेड्या आदिलशहाकडून गुलबर्ग्याचे शिवेश्र्वर मंदिर भ्रष्ट झाले. त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्याला शुचिर्भुत कार्य केले, ज्या हिंदूंना सक्तीने मुसलमान केले गेले त्या सर्वांना त्यांनी विधीयुक्त पुन्हा आपल्या हिंदू धर्मात घेतले. अशा हिंदवी स्वराज्य निर्माता कृष्णदेवरायाचे वारसदार कर्तृत्वशून्य निघाले. ज्या धर्मलंड आदिलशहाला कृष्णदेवरायाने अद्दल घडवली, त्याचेच वारसदार पुढे आदिलशहाच्या ताटाखालचे मांजर बनले.
हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमानी कणा मोडण्यासाठी सारी यवनी राजवट एकवटली. विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा ही सारी मंडळी आपापसातली भांडणतंटे बाजूला ठेवून, हिंदवी स्वराज्याचा नि:पात करण्यासाठी एक झाले. त्यांनी जिहाद पुकारून, आपापले सारे सैन्य एका छत्राखाली आणून विजयनगर साम्राज्यावर तुटून पडले आणि विजयनगर साम्राज्याचा दारूण अस्त घडवून आणला. जगाला चकित करणारी मनोरम शिल्पे, भव्य मंदिरे या यवनांनी छिन्नविछिन्न केली. आज त्या भग्न अवशेषातूनही श्रीकृष्णदेवरायाच्या कलासक्त मनाचे संपन्न कर्तृत्व दिसून येते. आजही असंख्य पर्यटक कृष्णदेवरायाच्या या विजयीनगरीला अभिवादन करण्यासाठी शिल्पचतुराई जोखण्यासाठी गर्दी करून जातात.
श्रीकृष्णदेवरायाच्या राज्यकर्तृत्वाचे गुणगान लोकमान्य टिळकांनी सुद्धा गाईले आहे.
लोकमान्य टिळक इंग्लंडला डेप्युटेशन घेऊन जात असताना मद्रास येथील आंध्रमंडळींनी "गोखले हॉल'मध्ये त्यांना एक मानपत्र अर्पण केले. त्यास उत्तर देताना लोकमान्य टिळक म्हणाले, ""मी आज रोजी आंध्र आणि मराठे या उभयतांना अशाकरिता एकत्र करीत आहे की, राजकीय सुधारणेची तत्त्वे जी मराठी राज्यकर्त्यांनी उचलली ती सर्व विजयनगर येथील आंध्र राजांकडूनच होय. म्हणून आम्ही मराठे तुमच्या आंध्र लोकांचे एकप्रकारे ऋणी आहोत. शिवाजी महाराजांनी व त्यांच्यामागून मराठे राजमंडळांनी जी राज्यव्यवस्था केली ती विजयनगरच्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच होती.'' (मुंबई तेलुगू समाचार- संक्रांती पुरवणी इ.स. 1950)
आश्चर्य म्हणजे ज्या हिंदवी स्वराज्य निर्माणकर्त्या विजयनगर साम्राज्याचा अस्त 1674 साली झाला, त्याच वर्षी रायगडावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पुनश्च एकदा हिंदवी स्वराज्याची विजयीपताका फडकत राहिली। अस्तु!

डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली
भ्र. :9850074141