Friday, August 7, 2009

हिंदवी स्वराज्याचा संस्थापक -कृष्णदेवराय



7 ऑगस्ट 1509 विजयनगर साम्राज्याधिपती श्रीकृष्णदेवरायाचा "राज्याभिषेक' दिवस. हिंदवी स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम उरी बाळगणारा,
"गो-ब्राह्मण प्रतिपालक' बिरुदावली सार्थ करणारा, दक्षिणेतला शस्त्र आणि शास्त्र निपुण धुरंधर सम्राट-श्रीकृष्णदेवराय।


बरोबर आजला पाचशे वर्षांपूर्वी हा राजा होऊन गेला. "सकल कला संपन्न, शस्त्रतेजाने शत्रूंना धूळ चारणारा, काव्यगुणाने प्रतिभावंतांना पोसणारा, उत्तम राज्यकर्त्याचे धडे आपल्या ग्रंथलेखनातून भारतीयांच्या पुढे ठेवणारा सम्राट म्हणून कृष्णदेवरायाचं नाव इतिहासात चिरस्मरणीय आहे.
"विजयनगर साम्राज्य' म्हणजे भारतीय हिंदूू संस्कृतीचा, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा "महोन्नत महामेरू' म्हणून ओळखला जातो. धर्म, संस्कृती, कला आणि साहित्य यासंदर्भात या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या कुलवंशातल्या सर्व सम्राटांत कृष्णदेवराय हा एक अतुलनीय असा दिग्गज सम्राट होऊन गेला. याच्या कारकीर्र्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्रीचैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी महापुरुषांना या सम्राटाने सन्मानित केले आहे. प्रख्यात माध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरुदेव होत.
विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत याने आपले साम्राज्य विस्तारले. आपला वराहचिन्हांकित यशोध्वज सदा फडकावीत ठेवला. नाट्य, संगीत, शिल्प, शौर्य आणि साहस या संदर्भात याचे कार्य अद्‌भूतच म्हणावे लागेल असे होते.
कन्नड, तेलुगू, तामिळ आणि संस्कृत या विविध भाषांतून त्याने मनोज्ञ असे ग्रंथ लेखन केले. आंध्रचा "भोजराजा' म्हणून कृष्णदेवरायाची ख्याती भारतीय इतिहासात मुद्रित. या सम्राटाच्या दरबारात प्रतिभासंपन्न अष्टदिग्गज कवीगण होते. "तेलुगू कालीदास' म्हणून सर्वश्रुत असलेल्या "श्रीनाथ' कवीची याने सुवर्णतुला केली. आपल्या कारकीर्दीतल्या अवघ्या एकोणीस वर्षांत या सम्राटाने अडोतीस लढाया केल्या आणि त्या सर्व जिंकल्या. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बिदरशाही, अहमदनगरची निजामशाही या साऱ्यांना चळचळा कापायला लावणारा हा एक शूर योद्धा होता. शत्रूंना आपल्या सीमेपर्यंत येऊ न देता, स्वत:हून शत्रूंचे दार ठोठावणारा हा एक हिंदवी स्वराज्य निर्माणकर्ता राजा होता. कृष्णदेवरायाने लिहिलेल्या काव्यग्रंथांपैकी "अमूल्य माल्यदा' हे काव्य तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यातले एक होय. एकंदरीत शस्त्र आणि शास्त्र याच्यावर अभूतपूर्व हुकुमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही, हे विधान तीळमात्र अतिशयोक्तीचे नाही.
भारतीय इतिहासकारांनी कृष्णदेवरायांच्या कर्तृत्व पराक्रमाची तुलना प्रभू श्रीराम, धर्मराज, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, पुलकेशी या दिग्गज नरपुंगवाशी केली आहे. हा जरी श्रीकृष्णदेवरायाचा दैदिप्यमान इतिहास असला तरी त्याच्या पुढच्या सम्राटांकडून मात्र घोर निराशा झाली. श्रीकृष्ण देवरायाची ताकद त्यानंतर झालेल्या सम्राटांना पेलवली नाही. इ.स. 1929 साली श्रीकृष्णदेवराय यांनी आपली सम्राटपदाची धुरा आपले चुलत बंधू अच्युतरायावर सोपवली. त्यानंतर तिरूमला, रामराजा, वेंकटाद्रि असे सम्राट होऊन गेले. हे सारे व्यसनी आणि दुर्बल निघाले.
ज्या श्रीकृष्णदेवरायाने विजापूरच्या आदिलशहाला सळो की पळो केले, खुद्द आदिलशहाच्या राजधानीत तळ ठोकून तीन महिने मुक्काम केला. ज्या धर्मवेड्या आदिलशहाकडून गुलबर्ग्याचे शिवेश्र्वर मंदिर भ्रष्ट झाले. त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्याला शुचिर्भुत कार्य केले, ज्या हिंदूंना सक्तीने मुसलमान केले गेले त्या सर्वांना त्यांनी विधीयुक्त पुन्हा आपल्या हिंदू धर्मात घेतले. अशा हिंदवी स्वराज्य निर्माता कृष्णदेवरायाचे वारसदार कर्तृत्वशून्य निघाले. ज्या धर्मलंड आदिलशहाला कृष्णदेवरायाने अद्दल घडवली, त्याचेच वारसदार पुढे आदिलशहाच्या ताटाखालचे मांजर बनले.
हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमानी कणा मोडण्यासाठी सारी यवनी राजवट एकवटली. विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा ही सारी मंडळी आपापसातली भांडणतंटे बाजूला ठेवून, हिंदवी स्वराज्याचा नि:पात करण्यासाठी एक झाले. त्यांनी जिहाद पुकारून, आपापले सारे सैन्य एका छत्राखाली आणून विजयनगर साम्राज्यावर तुटून पडले आणि विजयनगर साम्राज्याचा दारूण अस्त घडवून आणला. जगाला चकित करणारी मनोरम शिल्पे, भव्य मंदिरे या यवनांनी छिन्नविछिन्न केली. आज त्या भग्न अवशेषातूनही श्रीकृष्णदेवरायाच्या कलासक्त मनाचे संपन्न कर्तृत्व दिसून येते. आजही असंख्य पर्यटक कृष्णदेवरायाच्या या विजयीनगरीला अभिवादन करण्यासाठी शिल्पचतुराई जोखण्यासाठी गर्दी करून जातात.
श्रीकृष्णदेवरायाच्या राज्यकर्तृत्वाचे गुणगान लोकमान्य टिळकांनी सुद्धा गाईले आहे.
लोकमान्य टिळक इंग्लंडला डेप्युटेशन घेऊन जात असताना मद्रास येथील आंध्रमंडळींनी "गोखले हॉल'मध्ये त्यांना एक मानपत्र अर्पण केले. त्यास उत्तर देताना लोकमान्य टिळक म्हणाले, ""मी आज रोजी आंध्र आणि मराठे या उभयतांना अशाकरिता एकत्र करीत आहे की, राजकीय सुधारणेची तत्त्वे जी मराठी राज्यकर्त्यांनी उचलली ती सर्व विजयनगर येथील आंध्र राजांकडूनच होय. म्हणून आम्ही मराठे तुमच्या आंध्र लोकांचे एकप्रकारे ऋणी आहोत. शिवाजी महाराजांनी व त्यांच्यामागून मराठे राजमंडळांनी जी राज्यव्यवस्था केली ती विजयनगरच्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच होती.'' (मुंबई तेलुगू समाचार- संक्रांती पुरवणी इ.स. 1950)
आश्चर्य म्हणजे ज्या हिंदवी स्वराज्य निर्माणकर्त्या विजयनगर साम्राज्याचा अस्त 1674 साली झाला, त्याच वर्षी रायगडावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पुनश्च एकदा हिंदवी स्वराज्याची विजयीपताका फडकत राहिली। अस्तु!

डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली
भ्र. :9850074141

No comments:

Post a Comment