Monday, June 8, 2009

कांग्रेस विजयाचे गौड़बंगाल

संशयास्पद ठरणारे दोन निकाल
शिवगंगामध्ये नेमके काय घडले याची माहिती आता समोर आली आहे. या ठिकाणी अण्णा-द्रमुकचा उमेदवार फक्त दोनशे मतांनी विजयी झाला होता. चिदंबरम्‌ पराभूत झाले होते. या पराजयाला विजयात बदलविण्यासाठी पोस्टल बॅलेटची कल्पना समोर आली. केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांच्या अधिकाऱ्यांना कामी लावण्यात आले. शिवगंगातील मतदार शोधण्यात आले आणि काही-शे मतपत्रिकांचा गठ्ठा घेऊन सीमा सुरक्षा दलाचे विशेष विमान रवाना करण्यात आले. पोस्टल बॅलेटचे मतदान व विशेष विमानाचे उड्डाण या दोन्ही घटना शिवगंगात चिदंबरम्‌ पराभूत झाल्यानंतरच्या आहेत. ही एकच बाब शिवगंगा किती "प्रदूषित' झाली होती, हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे, असे मानले जाते.
कॉंग्रेस नेत्या डॉ. श्रीमती सुशीला रोहतगी एक मार्मिक उदाहरण देत. लोकसभा म्हणजे कपामधील चहा, गरमागरम, वाफाळलेला; आणि राज्यसभा म्हणजे बशीत ओतलेला चहा. किंचित थंड झालेला. श्रीमती रोहतगी यांचे हे उदाहरण पुढे चालवायचे झाल्यास- राजधानीतील पत्रकार, स्तंभलेखक, विश्लेषक, समीक्षक यांना "कोल्ड कॉफी' म्हणावे लागेल. जनभावनांची अभिव्यक्ती आणि त्या अभिव्यक्तीचे विश्लेषण यात फार मोठी तफावत व दरी असल्याचे निवडणुकीपूर्वी वाटत होते आणि निवडणुकीनंतर निकालांचे विश्लेषण करतानाही ते जाणवत आहे. डाव्या पक्षांची भूमिका, वरुण गांधी प्रकरण, युवांना प्राधान्य अशी काही कारणे सांगून लोकसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण केले जाते. पण, नेमके विश्लेषण काय? नवी लोकसभा गठित झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनासाठी खासदार मंडळी राजधानीत आहेत. दोन्ही बाजूच्या जवळपास 50 खासदारांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्याशी चर्चा करताना एक बाब जाणवली; ती म्हणजे, आपण पराभवाचे जे विश्लेषण करतो- या खासदारांची भूमिका, त्यांचे विश्लेषण नेमके विरुद्ध आहे. या खासदारांचे अनुभव, त्यांच्या मतदारसंघातील व्होटिंग पॅटर्न या बाबी मतदारसंघागणिक बदलणाऱ्या आहेत. या नवनिर्वाचित खासदारांशी जशी चर्चा करता आली, तशी भाजपाच्या एका पराभूत उमेदवाराशी चर्चा झाली. त्याचे नाव रमेश विधुडी. राजधानीत भाजपाला जी एक जागा मिळेल असे मला वाटत होते, ती जागा होती रमेश विधुडींची. रमेश विधुडी हा गुजर नेता. इतर सर्व खासदारांपेक्षा रमेश विधुडीचे विश्लेषण अधिक वास्तववादी वाटले. कारण, रमेश विधुडी मला ओळखत नव्हते. अतिशय निरागसपणे, मोकळेपणे ते बोलले. एका मित्राच्या निवासस्थानी विधुडींची भेट झाली. दोन तास ते जे बोलले ते आहे भाजपाच्या पराभवाचे 90 टक्के सत्य असणारे विश्लेषण.
रमेश विधुडी हे काही फार सुशिक्षित नाहीत. जनतेतून समोर आलेला हा नेता. शेवटी लोकशाहीत जनतेला काय वाटते, हेच महत्त्वाचे व निर्णायक असते आणि म्हणून सर्व पत्रकार व राजधानीतील विश्लेषक यांच्या विश्लेषणापेक्षा विधुडींचे विश्लेषण अधिक समर्पक मानले जाते. कारण, ते स्वत: निवडणूक प्रक्रियेत उमेदवार होते. विधुडींनी केलेल्या विश्लेषणाचा या ठिकाणी उल्लेख करणे उचित होणार नाही. कारण, ते जेव्हा माझ्याशी बोलत होते, तेव्हा आपण एका पत्रकाराशी बोलत आहोत हे त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्या विश्लेषणाचा संदर्भ देणे, पत्रकारितेच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध मानले जाईल.
मुस्लिम मतदार
या निवडणुकीत मुस्लिम मतदारांच्या भूमिकेवर उलट-सुलट चर्चा होत आहे. या पैलूंवर चार नेत्यांशी चर्चा झाली. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंगांचा मुलगा अखिलेश यादव, भागलपूरचे भाजपा खासदार शहानवाज हुसैन आणि मराठवाड्यातील भाजपा आमदार पाशा पटेल. यातील आश्चर्याची बाब म्हणजे जी भाषा पाशा पटेल बोलत होते, तीच बाब अखिलेश यादव, शहानवाज हुसैन बोलत होते. शहानवाज हुसैन यांना 50 टक्के मुस्लिमांची मते मिळाली. बीड मतदारसंघात गोपीनाथ मुंडेंना हाच अनुभव आला. मी, जेव्हा यावर शंका घेतली, पाशा पटेल यांनी मला मुस्लिम प्रभावाच्या मतदान केंद्रांवरील मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी फॅक्सने पाठविली. ती चकित करणारी होती.
80 टक्के मुस्लिम गाव
गाव आडसकर मुंडे
अर्धमसला 179 381
शिरसदेवी 179 369
रामतीर्थ 187 211
शिरसाळा 309 262
मांडवा पठाण 379 399
केज शहर 4390 3331
90 टक्के मुस्लिम गाव
पाथ्रुड 238 254
कडा २३५ 318
पिंपळा 218 270
भाळवणी 312 328
70 टक्के मुस्लिम गाव
रसुलाबाद 78 177
घोंडराई 272 275
ब्रह्मगाव १५० 218
या गावांचा संदर्भ केवळ उदाहरणासाठी दिला आहे. अशा मतदान केंद्रांची संख्या भरपूर आहे. भागलपूरमध्येही शहानवाज हुसैन यांना भरपूर मुस्लिम मते पडली. मग, याचा अर्थ भागलपूर व बीड मतदारसंघात निवडणुकीच्या काळात दूरचित्रवाहिन्या काम करत नव्हत्या, असा काढावयाचा काय? येथे वरुण गांधींचा परिणाम झाला नाही काय? म्हणूनच राजकीय निकष एका फटकाऱ्यात काढावयाचे नसतात. ही एक अतिशय गुंतागुंतीची बाब असल्याने प्रत्येक मतदारसंघानुसार विचार करावा लागेल. असा विचार या स्तंभात करणे शक्य नसल्याने फक्त दोनच मतदारसंघांतील निकालांची चर्चा येथे करीत आहे.
तामिळनाडूतील शिवगंगा
तामिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातील निकाल "धक्कादायक' मानला जातो. शिवगंगातून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम्‌ विजयी झाले आहेत. त्यांनी अण्णाद्रमुकच्या उमेदवारास पराभूत केले. शिवगंगाच्या मतमोजणीत चिदंबरम्‌ पिछाडीवर होते. नंतर ते पराभूत झाले. अण्णाद्रमुकच्या समर्थकांनी फटाके फोडून आपला विजय साजरा केला. हे दृश्य सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दाखविले आणि रात्री उशिरा चिदंबरम्‌ विजयी झाले. हे कसे झाले?
पोस्टल बॅलेट
निवडणुकीत पोस्टल बॅलेट नावाचा एक प्रकार असतो. मतदारसंघाबाहेर राहणाऱ्या मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे. निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू होताना सर्वप्रथम पोस्टल बॅलेट- पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी केली जाते. शिवगंगात नेमके उलट झाले. मतमोजणीत पी. चिदंबरम्‌ पराभूत झाल्यानंतर पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली व चिदंबरम्‌ यांना विजयी घोषित करण्यात आले.
विमानाचे लॉगबुक
चिदंबरम्‌ पराभूत होत आहेत याची चिन्हे दिसू लागताच चिदंबरम्‌ यांनी पोस्टल मतांची कल्पना समोर आणली. दक्षिण भारतातील अनेक युवक केंद्रीय पोलिस दलांमध्ये भरती आहेत. राजधानी दिल्लीत तैनात अशा युवकांची संख्या मोठी आहे. शिवगंगातून आलेल्या या युवकांचे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान घेण्यात आले आणि मतपत्रिकांचा गठ्ठा विशेष विमानाने शिवगंगाला नेण्यात आला. विमानाचे लॉगबुक पाहिल्यानंतर हे सिद्ध करता येते. चिदंबरम्‌ गृहमंत्री, त्यांच्यासाठी मतदान करविण्यात आलेले मतदार, केंद्रीय राखीव दलातील जवान आणि मतपत्रिकांचा गठ्ठा शिवगंगाला नेणारे विमानही भारतीय सीमा सुरक्षा दलाचे. शिवगंगात हा प्रकार घडला. चिदंबरम्‌ यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहेच. पण देशाच्या गृहमंत्र्याने आपल्या मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा हा पहिलाच प्रकार मानला पाहिजे. कॉंग्रेसमधील नेते दबक्या आवाजात ही बाब मान्य करतात. पक्षातील बहुतेक नेत्यांना पी. चिदंबरम्‌ पराभूत व्हावे, असे वाटत होते. चिदंबरम्‌ विजयी झाल्याचा अण्णाद्रमुकला जेवढा धक्का बसला, त्यापेक्षा मोठा धक्का कॉंग्रेस नेत्यांना बसला, असे म्हटले जाते.
शिवगंगामध्ये नेमके काय घडले याची माहिती आता समोर आली आहे. या ठिकाणी अण्णा-द्रमुकचा उमेदवार फक्त दोनशे मतांनी विजयी झाला होता. चिदंबरम्‌ पराभूत झाले होते. या पराजयाला विजयात बदलविण्यासाठी पोस्टल बॅलेटची कल्पना समोर आली. केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांच्या अधिकाऱ्यांना कामी लावण्यात आले. शिवगंगातील मतदार शोधण्यात आले आणि काही-शे मतपत्रिकांचा गठ्ठा घेऊन सीमा सुरक्षा दलाचे विशेष विमान रवाना करण्यात आले. पोस्टल बॅलेटचे मतदान व विशेष विमानाचे उड्डाण या दोन्ही घटना शिवगंगात चिदंबरम्‌ पराभूत झाल्यानंतरच्या आहेत. ही एकच बाब शिवगंगा किती "प्रदूषित' झाली होती, हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे, असे मानले जाते.
अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेशातील दोन जागांपैकी एका जागेचा निकाल असाच वादग्रस्त ठरला आहे. येथून भाजपाचे खासदार श्री. किरण रिज्जू यांनी फेरनिवडणूक लढविली होती. श्री. रिज्जू पराभूत झाले. पण, त्यांच्या मतदानाचे आकडे बोलके आहेत. अनेक मतदान केंद्रांवर एकूण मतदारांपेक्षा अधिक मते कॉंग्रेसला मिळाली. म्हणजे एखाद्या मतदान केंद्रावर 500 मतदार असतील, तर येथे जास्तीत जास्त किती मतदान होऊ शकते? अगदी सर्व मतदारांनी मतदान केले हे गृहीत धरले तरी जास्तीत जास्त 500 मते नोंदविली जाऊ शकतात. 501 वे मत तर पडू शकत नाही. कारण, एकूण मतदारच मुळी 500 आहेत. पण, येथे तसे झालेले नाही. ज्या केंद्रावर एकूण मतदार 500 आहेत तेथे 1500 मतदारांनी मतदान केलेले आहे. आणि हे एक-दोन नाही तर पन्नासहून अधिक मतदान केंद्रांवर झालेले आहे. श्री. रिज्जू निवडणूक आयोगाकडे जाऊन आलेत. तेथील अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही. मात्र, यावर अधिक काही बोलण्यास त्यांचा नकार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे
या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एखादा पक्ष पराभूत झाल्यानंतर त्या पक्षाने असा प्रश्न उपस्थित करणे हास्यास्पद ठरेल. त्याला विश्वसनीयता असणार नाही. पण, अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित करीत आहेत. या शंका-कुशंकांना पुराव्यांचे बळ नसल्याने आज त्यावर काही बोलणे उचित ठरणार नाही. अमेरिकेत या यंत्रांचा वापर करण्यात आला. तेथे न्यायालयात याला आव्हान देण्यात आले. ही यंत्रे "फुल-प्रुफ' नाहीत, असा न्यायालयांचा आदेश आल्यानंतर मतदान यंत्रांचा वापर केला जात असतानाच "पेपर बॅकअप'ही सुरू करण्यात आले. म्हणजे यंत्रांच्या वापरासोबतच मतपत्रिकांचाही वापर करण्यात आला. भारतात काय होते ते पहावयाचे.
रवींद्र दाणी, नवी दिल्ली

1 comment:

  1. राम राम सिध्दाराम जी, माहिती बद्दद्ल फ़ार आभार, अशा वास्तवीक घटने चा प्रसार करने अत्यन्त आवशक्ता आहे माझा वतिने प्रयत्न चालु आहे ....धन्यवाद...

    ReplyDelete